

Crime Investigation Dharmasthala
बंगळूर : धर्मस्थळ परिसरात शंभरावर महिलांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावल्याची तक्रार दाखल करणार्या तक्रारदाराने मृतदेह दफन केलेली 13 ठिकाणे विशेष तपास पथकाला दाखवली. पैकी एका ठिकाणी उत्खनन सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे स्थळ नेत्रावती नदीकाठी असून, चार फूट खोदाईनंतर खड्ड्यात पाणी भरले. त्यामुळे खोदाईत अडथळा येत असून, बुधवारपासून खोदाईसाठी जेसीबी यंत्रांचा वापर केला जाणार आहे. चार फुटांपर्यंत कुठलेही अवशेष सापडले नाहीत, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.
सोमवारी धर्मस्थळातील नेत्रावती स्नानघाटाच्या आसपासच्या भागात तक्रारदाराने मृतदेह पुरल्याची 13 ठिकाणे पोलिसांना दाखवली होती. एसआयटीचे अधिकारी मंगळवारी तेथे पोहोचले आणि खोदकाम सुरू केले. उत्खनन स्थळ नेत्रावती नदीच्या काठावर असल्याने खड्ड्यात पाणी शिरत आहे. खड्डा काढताना वाळू कोसळत असल्याने केवळ चार फूट खोदकाम झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
पुढचे उत्खननाचे काम जेसीबी वापरून करावे लागणार आहे. मात्र, वनक्षेत्रात जेसीबी वापरावयाचे असल्यास वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. यासाठी विशेष तपास पथक वन विभागाकडून परवानगी मागण्याची तयारी करत आहे. तक्रारदाराने दाखवलेल्या ठिकाणांपैकी एका ठिकाणी सुरू झालेले उत्खनन काम पूर्ण झाल्यानंतरच पुढील ठिकाणाची चौकशी केली जाईल.
खोदकामातून मिळणार्या पुराव्यांवरच या गंभीर आरोपांचे भवितव्य अवलंबून आहे. ही कारवाई पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथक गुन्हेस्थळावरचे पुरावे गोळा करण्यासाठी सज्ज आहे. खोदकाम प्रक्रियेचे चित्रीकरण केले जात आहे, जेणेकरून प्रत्येक तपशील नोंदवला जाईल. तपास अधिकारी जितेंद्र कुमार दायमा, पुत्तूरच्या सहायक आयुक्त स्टेला वर्गीस आणि बेळतांगडीच्या तहसीलदार पृथ्वी सानिकम यांच्यासह उच्चस्तरीय अधिकार्यांची टीम घटनास्थळी उपस्थित होती.
तक्रारदाराने एकूण 13 जागा ओळखल्या आहेत, जिथे त्याने मृतदेह दफन केले किंवा जाळले असल्याचा दावा केला आहे. एसआयटीच्या एका अधिकार्याने सांगितले की, पहिल्या जागेवरील खोदकामाच्या निकालावरच आम्ही त्याच्या दाव्यांची सत्यता तपासू. जर येथे काही आढळले नाही, तर आम्ही ओळखलेल्या सर्व 13 ठिकाणी खोदकाम सुरू ठेवू. आम्ही स्वतः या प्रकरणाच्या सत्यापर्यंत पोहोचण्यास उत्सुक आहोत. या सर्व 13 संशयित जागांना फॉरेन्सिक टीमने आधीच घेरले असून, प्रत्येक जागेवर दोन नक्षलवादविरोधी दलातील जवानांना तैनात करण्यात आले आहे. ड्रोनच्या सहाय्याने या जागांचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे.