फडणवीस कायम, बावनकुळेंना अभय

फडणवीस कायम, बावनकुळेंना अभय
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपच्या या पराभवाच्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक केंद्रीय नेतृत्वासोबत दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती यावर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटनेत कुठलेही बदल होणार नाही अशी स्पष्टोक्ती बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार आहेत. सोबतच आगामी निवडणुका फडणवीस यांच्यात नेतृत्वात लढवल्या जातील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाच्या बाबतीत पक्षाने अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही, देवेंद्र फडणवीस आपल्या जबाबदारीवर कायम राहणार असल्याचे समजते.

दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सहप्रभारी अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे संघटनमंत्री बी. एल. संतोष, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते. तर महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे हे नेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मला मंत्रिमंडळाच्या जबाबदारीतून मोकळे करा,' असे म्हणताना महायुतीमधील समन्वयासंदर्भातही भाष्य केले होते. असे असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या 'मला मंत्रिमंडळ जबाबदारीतून मोकळे करा' या मागणीवर तूर्तास चर्चा झाली नसल्याचे समजते.

मित्रपक्षांसोबत चर्चा करणार ः फडणवीस

बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपच्या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक केंद्रीय नेतृत्वासोबत झाली. यामध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली, कुठे मतदान कसे झाले, कुठे कमी-जास्त झाले यावर चर्चा केली. अगदी थोडे म्हणजे 0.3 टक्के अंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूक मित्रपक्षांसह पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आजच्या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आम्ही एनडीएमध्ये असलेल्या राज्यातील मित्र पक्षांसोबत चर्चा करू, असेही ते म्हणाले.

गोयल म्हणाले 'नो 'चेंज'

प्रदेशाध्यक्षबदला संदर्भात विचारले असता केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, 'नो चेंज', प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात आणि अन्य काहीही बदल होणार नाही. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत सांगितले असले तरी आगामी निवडणुका फडणवीस यांच्यात नेतृत्वात लढवल्या जातील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाच्या बाबतीत पक्षाने अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आपल्या जबाबदारीवर कायम राहणार, असे संकेत दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news