बंगळूर : वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'च्या 'चांद्रयान-३' या मोहिमेने जागतिक विक्रम प्रस्थापित केल्यानंतर आता 'चांद्रयान-४' आणि 'चांद्रयान-५'चे डिझाईनही तयार असल्याची माहिती 'इस्रो'चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. येत्या ५ वर्षांत भारताकडून ७० उपग्रह प्रक्षेपित होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
७० उपग्रहांबाबतच्या योजनांवरही 'इस्रो'चे काम सुरू झालेले आहे, असे ते म्हणाले, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि इंडियन स्पेस असोसिएशनच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. 'चांद्रयान-४' आणि 'चांद्रयान-५'चे डिझाईन तयार झाल्यानंतर सरकारकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आगामी ५ वर्षांत प्रक्षेपित होऊ घातलेल्या ७० उपग्रहांत लो अर्थ ऑर्बिट उपग्रहांचे (पृथ्वीच्या तळातील कक्षेसाठी) प्रमाण त्यात लक्षणीय आहे. है उपग्रह विविध मंत्रालये आणि सरकारच्या विविध विभागांच्या गरजा पूर्ण करतील.
हाय रिझॉल्यूशन प्रतिमा टिपणे, हवामानाचा अंदाज वर्तविणे आदीसाठी पाठवायचे विशिष्ट उपग्रहही त्यात आहेत. इनसेंट ४ डी हा हवामान उपग्रह आहे, तर रिमोट सेन्सिंग आणि उच्च रिझॉल्युशन इमेजिंगसाठी कार्टोसेंट हा उपग्रह आहे, असे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.
गगनयान मोहिमेसाठी 'इस्रो'कडून डेटा रिले उपग्रह, इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने उपग्रह विकसित केले जात आहेत. जी-सेंट हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन रकिटवरून प्रक्षेपित होईल. तो आम्ही अमेरिकेला पाठवणार आहोत, असे ते म्हणाले.
'चांद्रयान-४' मोहिमेंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लैंडिंग करणे, चंद्रावरील दगड आणि माती पृथ्वीवर आणणे, चंद्रावरून अंतराळ यान प्रक्षेपित करणे, चंद्राच्या कक्षेत स्पेस डॉकिंग प्रयोग करणे यांचा समावेश आहे.