पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीत जुन्या राजेंद्र नगमधील केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा मृत्यू झाला. अभ्यासिकेत अचानक पूराचे पाणी घुसल्याने यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास आज (दि.२ ऑगस्ट) सीबीआयकडे सोपवला आहे, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पाणी घुसल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल घेऊन कोचिंग सेंटरचा मालक आणि संयोजकासह अनेकांना अटक केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली होती.
या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान न्यायालयाने या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत, भ्रष्टाचाराचारात लोकप्रतिनिधींचा संभाव्य सहभाग हे प्रमुख कारण नमूद केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगला (CVC) नागरी सेवांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मृत्यूचा तपास सीबीआय कडे सोपवला आहे. तसेच CBI तपासावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, लायब्ररी 7 वाजण्याच्या सुमारास बंद होते. यावेळी सुमारे 30 विद्यार्थी उपस्थित होते. आम्हाला बाहेर पडण्यास सांगण्यात आले. दरम्यान, सर्व विद्यार्थी तळघरातून बाहेर पडत होते. मात्र पाणी इतके वेगाने आले की, काही विद्यार्थी अडकले आणि दोन ते तीन मिनिटांत संपूर्ण तळघर तुडुंब भरले. पावसाचे पाणी इतके घाण होते की, खाली काहीच दिसत नव्हते. शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींनुसार कोणत्याही कोचिंग सेंटर आणि लायब्ररीच्या इमारतींचे बांधकाम झालेले नाही. अपघातस्थळी बचावकार्यासाठी कोणत्याही प्रकारची अतिरिक्त जागा नाही. याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे अशा घटना या भागात घडत आहेत.