

नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या स्फोटामागील सूत्रधार स्फोटके आणि रॉकेट वापरून शस्त्रसज्ज ड्रोन बनवण्याच्याही तयारीत होते, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) ने दुसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर उघड केली. या प्रकरणातील कथित आत्मघाती बॉम्बर डॉ. उमर उन नबी याचा साथीदार असलेला काश्मीरमधील रहिवासी जसीर बिलाल वानी (डॅनिश) याच्या श्रीनगरमधून मुसक्या आवळल्या.
‘एनआयए’च्या तपासात जसीरने या हल्ल्यासाठी तांत्रिक मदत पुरवल्याचे आणि प्राणघातक कार बॉम्बस्फोटापूर्वी ड्रोनमध्ये बदल करून रॉकेट बनवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या स्फोटात 15 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 32 जण जखमी झाले होते. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंडचा रहिवासी असलेला हा आरोपी हल्ल्यामागील कटात सक्रिय सहभागी होता. दहशतवादी उमर उन नबीसोबत मिळून त्याने या दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. तपास यंत्रणा या बॉम्बस्फोटामागील कटाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादविरोधी पथकाच्या अनेक टीम्स विविध राज्यांमध्ये शोध घेत असून, या हल्ल्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
दिल्ली बॉम्बस्फोटातील दोषींना पाताळातूनही शोधून काढून कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. उत्तर विभागीय परिषदेच्या 32 व्या बैठकीदरम्यान बोलताना शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहे.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील आरोपी अमीर रशीद अली याला दिल्ली न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या 10 दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याने स्फोटात मरण पावलेल्या उमरला स्फोटासाठी गाडी घेऊन दिल्याचा आरोप आहे.