

Delhi riots 2020 : २०२० मधील ईशान्य दिल्लीतील दंगलीदरम्यान गुप्तहेर विभागाचे (IB) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने सोमवारी आम आदमी पक्षाचे (AAP) माजी नगरसेवक ताहीर हुसेन याच्यासह इतर चौघांना दोषी ठरवले.
मृत अधिकारी अंकित शर्मा यांचा मृतदेह नंतर एका नाल्यात सापडला होता. त्यांची ओळख लपवण्यासाठी त्यांचा चेहरा आणि शरीराचे इतर भाग ॲसिडने जाळण्यात आले होते. अंकित शर्मा यांचे वडील रवींद्र कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून २६ फेब्रुवारी २०२० रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रवींद्र कुमार यांनी तक्रारीत पुढे आरोप केला की, तत्कालीन नगरसेवक मोहम्मद ताहीर हुसेन याचे मुख्य करावल नगर रोडवरील चांद बाग पुलियाजवळ कार्यालय होते. त्याने आपल्या कार्यालयात मोठ्या संख्येने गुंड गोळा केले होते. ताहीर हुसेन यांच्या इमारतीवरून/कार्यालयाच्या छतावरून जमावाने दगड, पेट्रोल बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला, ज्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रवींद्र कुमार यांनी त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की, मुख्य करावल नगर रोडवरील चांद बाग पुलिया येथे सीएए (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) विरोधी आणि सीएए समर्थकांमध्ये २-३ दिवसांपासून निदर्शने सुरू होती. या दरम्यान दोन्ही बाजूंनी दगडफेक, विटा फेकणे, जाळपोळ, गोळीबार आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या.
कडकडडुमा न्यायालयाने ताहीर हुसेन हा दंगल घडवणे, हल्ला करणे, गुन्हेगारी बळाचा वापर आणि हत्या या आरोपांखाली दोषी आढळलाआहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर ताहीर हुसेन यांना 'आप'मधून निलंबित करण्यात आले होते.