

श्रीनगर ः फरिदाबाद येथे स्फोटकांच्या साठ्यासह पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत तीन डॉक्टरांचा समावेश असल्याचे समोर आल्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. तथापि, यामागे ‘जिहादी’ मानसिकता असल्याचे उघड झाले आहे.
डॉ. आदिल अहमद राथेर, डॉ. मुझम्मिल शकील आणि महिला डॉ. शाहीन शाहीद यांच्या मेंदूत ‘जिहाद’चे विष एवढे खोलवर कालवण्यात आले की, त्यामुळे ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणतेही वेडे धाडस करण्यास तयार झाले होते. अर्थात, या गोष्टी एवढ्या सहजपणे घडलेल्या नाहीत. 2017 मध्ये झाकीर मुसा नावाच्या दहशतवाद्याने काश्मीर खोऱ्यात ‘अन्सार गजवात-उल-हिंद’ या नावाने स्वतःची दहशतवादी संघटना स्थापन केली होती. याद्वारे तो युवकांना एकत्र करून त्यांच्या मेंदूत फुटीरवादाची बीजे पेरत गेला. मुसाने नंतरच्या काळात मसूद अझहरशी संधान बांधले. तसेच ‘अल-कायदा’ आणि पाकिस्तानची लष्करी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’शी त्याने सूत जुळवले. डॉ. आदिल आणि डॉ. मुझम्मिल हे दोघेही काही काळ मुसाच्या संपर्कात आले होते. तोच प्रभाव आजही त्यांच्या मनावर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुसा हा सुरुवातीला ‘हिजबुल मुजाहिद्दीन’शी संबंधित होता. नंतर त्याने या संघटनेशी फारकत घेऊन स्वतःची वेगळी चूल थाटली. मात्र, अवघ्या दोनच वर्षात म्हणजे 2019 मध्ये सुरक्षा दलांशी चकमकीत तो मारला गेला. त्याने अनेकदा काश्मीर खोऱ्यातील ‘हुर्रियत’च्या अनेक मवाळ नेत्यांना धमकी दिली होती. मुसा मारला गेल्यानंतर हमीद नावाच्या दहशतवाद्याकडे ‘अन्सार गजवात-उल-हिंद’ या संघटनेची सूत्रे आली. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी मुसाच्या संघटनेचा खेळ संपल्याची घोषणा केली होती. मात्र, या संघटनेचा प्रभाव अजूनही काश्मीर खोऱ्यातील काही युवकांच्या मनावर कायम असल्याचे दिसून येते.
आतापर्यंत अर्धशिक्षित किंवा जुजबी शिक्षण घेतलेल्या युवकांना दहशतवादी म्होरके आपल्या संघटनेत सामील करून घेत होते. आता त्यांनीही काळाच्या ओघात उच्चशिक्षितांना ‘जिहाद’च्या नावाखाली स्वतःच्या संघटनेकडे आकृष्ट करून घेण्याचा नवा फंडा अवलंबल्याचे उघड झाले आहे. पुलवामाचा रहिवासी असलेला डॉ. मुझम्मिल फरिदाबादच्या अल फलाह हॉस्पिटलमध्ये, तर डॉ. आदिल हा अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होता.