

नवी दिल्ली ः शाहीनला अटक केल्याची माहिती मिळताच तिच्या लखनौमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. लालबागमधील तिचे घर आणि डालीगंजमधील जुन्या घरात पोलिसांनी सुरू केलेल्या झाडाझडतीनंतर हा संपूर्ण परिसर चर्चेत आला आहे. या संपूर्ण परिसरात सन्नाटा पसरला आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीनच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. ती कुख्यात दहशतवादी मसूद अझहरची बहीण सहिदाच्या संपर्कात होती. तिच्या सल्ल्यानुसार भारतात महिला दहशतवादी ब्रिगेड बनविण्याचा कट त्यांनी आखला होता. तशा कारवायाही सुरू होत्या. शाहीन ही ‘जैश’च्या ‘जमात-उल-मोमिना’शीही संबंधित आहे.
डॉ. शाहीन मूळची लखनौ येथील आहे. ती सोमवारी पकडण्यात आलेल्या डॉ. मुजम्मिलची गर्लफ्रेंड आहे. तिलाही हरियाणाच्या फरिदाबादमधून सोमवारी अटक करण्यात आली आहे. ती फरिदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीत काम करत होती, असे सांगितले जात आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मुजम्मिलशी संबंध असल्याचे समजताच तिला फरिदाबादमधून ताब्यात घेतले होते. तिने आपल्या कारमध्ये एके-47 लपविली होती. चौकशीअंती तीही या नेटवर्कमध्ये होती, असे स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाले आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
डॉ. शाहीन लखनौमधील खंदारी बाजारमधील 121 नंबरच्या घरात कुटुंबीयांसह राहते. याच परिसरात त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिचे सर्व कुटुंबीय सुशिक्षित आहेत आणि शांत स्वभावाचे आहेत, असे गल्लीतील लोक सांगतात. वडील रिटायर्ड कर्मचारी आहेत. मोठा मुलगा शोएब त्यांच्यासोबत राहतो. या कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीन बऱ्याच वर्षांपासून शिक्षणासाठी लखनौबाहेर होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी ती फरिदाबादमध्ये होती. काही वर्षांपूर्वी तिचे लग्न महाराष्ट्रातील एका युवकासोबत झाले होते.
शाहीन लहानपणापासूनच हुशार होती. मला डॉक्टर व्हायचे आहे, असे ती नेहमी म्हणत असे. तिने हे स्वप्न पूर्णही केले. तिला दहशतवादी कारवायांमध्ये अटक केल्याच्या बातमीवर तिच्या गल्लीतील लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. तिचे वडील सांगतात, शाहीन लहानपणापासूनच कष्टाळू आणि संवेदनशील आहे. माझी आई आजारी पडली होती तेव्हा घरी येऊन डॉक्टर तिच्यावर उपचार करत. तेव्हापासूनच तिने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला होता. तिने जिद्दीने अलाहाबाद मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही काळ दिल्लीत काम केल्यानंतर तिला फरिदाबादमध्ये नोकरी मिळाली.
शाहीनच्या वडिलांना तिला अटक झाल्याचे समजताच धक्काच बसला. त्यांना सुरुवातीला अजिबात विश्वास बसत नव्हता. माझी मुलगी डॉक्टर आहे. तिने आपले आयुष्य लोकांच्या सेवेसाठी दिले आहे. ती असल्या वाईट मार्गाला कधीही जाणार नाही, असे ते वारंवार सांगत होते.