

Delhi Rain |
दिल्ली : राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये आज सकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचून रस्ते जलमय झाले. काही भागात गारपीटही झाली. पावसाशी संबंधित घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. विमानसेवेलाही पावसाचा फटका बसला. एकंदरीत पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शुक्रवारी सकाळी दिल्लीत वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. पावसामुळे दिल्ली प्रशासनाची झोप उडाली. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले. भारतीय हवामान विभागाने (IMD) राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन तासांत दिल्ली आणि आसपासच्या भागात ७०-८० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. काही भागात गारपीटही झाली आहे. अनेक ठिकाणी कार, बस आणि इतर वाहने पाण्यात बुडाली. मुसळधार पावसाने सकाळीच महत्त्वाच्या ठिकांणावरील रस्ते पाण्यात बुडाल्याने जनतेचे हाल झाले.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी जोरदार वाऱ्यामुळे द्वारकेतील खाराखरी नाहर गावात एका शेतातील ट्यूबवेलच्या खोलीवर झाड कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. मृतांची ओळख ज्योती (२६) आणि तिची तीन मुले अशी झाली आहे. तिचा पती अजय किरकोळ जखमी झाला.
शुक्रवारी सकाळी दिल्लीत वादळी वारे आणि गारांसह मुसळधार पाऊस पडल्याने ४० हून अधिक विमानांचे उड्डाण वळवण्यात आले आणि जवळपास १०० उड्डाणे उशिराने झाली. दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला परंतु दैनंदिन जीनजीवन विस्कटले.
पालम हवामान केंद्राने ७४ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची पुष्टी केली आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, पुढील काही दिवस उष्णतेपासून आराम मिळेल आणि कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिल्लीत वादळासाठी जारी केलेला रेड अलर्ट सकाळी ८.३० पर्यंत वाढवला. यासोबतच, आयएमडीने लोकांना घरातच राहण्याचा आणि दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आयएमडीने कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
१ मे ते ७ मे दरम्यान वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे तापमान ३४ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे, १ मे च्या रात्रीपासून ४ मे च्या सकाळपर्यंत हवामानात बदल होईल, ५ आणि ६ मे रोजी संध्याकाळी वादळे आणि ढगफुटीच्या घटना घडतील, असे हवामान विभागाने सांगितले आहे. यापूर्वी, हवामान खात्याने १ ते २ मे दरम्यान पाऊस आणि वादळाचा यलो अलर्ट जारी केला आहे.