दिल्लीची दाणादाण; एकाच पावसात राजधानी बेहाल; ६ जणांचा मृत्यू

वीज, पाणीपुरवठा खंडीत; १ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
Delhi rain
पहिल्याच पावसात राजधानी दिल्लीत पाणीच पाणी झाले, यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचून रस्ते जलमय झाले. यमुना नदीच रस्त्यावर अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंत्री, खासदारांचे बंगले असलेल्या परिसरातही गुडघाभर पाणी साचले. शुक्रवारी पावसाशी संबंधित घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान, दिल्लीला १ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

संसदेचे पहिले अधिवेशन सुरू असतानाच दिल्लीत मोठा पाऊस झाला. या पावसामुळे दिल्ली प्रशासनाची झोप उडाली. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले. कार, बस आणि इतर वाहने पाण्यात बुडाली. दिल्लीत २४ तासांत २२८.१ मिमी पावसाची नोंद झाली. दिल्ली विमानतळ, प्रगती मैदान बोगदा, कर्तव्यपथ, कॅनॉट प्लेस, एम्स रुग्णालय आदी महत्त्वाच्या ठिकांणावरील रस्ते पाण्यात बुडाल्याने जनतेचे हाल झाले. भाजपचे नगरसेवक रविंदर सिंह नेगी यांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चक्क होडी चालवत दिल्ली महापालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आणला. रस्त्यावर पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालय गाठण्यास उशीर झाला. दिल्लीच्या जलमंत्री अतिशी यांच्या घरासमोर पाणी साचले. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यासह अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर पाणी तुंबले. समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांच्या बंगल्यासमोर पाणी साचल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी यादव यांना चक्क उचलून घेत गाडीपर्यंत नेले. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिल्ली सरकार, जल बोर्ड, पोलिस, एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Delhi rain
दिल्ली विमानतळावर लोखंडी छत कोसळून 1 ठार, 6 जखमी

दिल्ली सरकारवर निशाणा

पहिल्याच पावसात दिल्लीकरांची दैना उडाल्याने काँग्रेस आणि भाजपने आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली. दिल्ली सरकार जबाबदारीपासून पळ काढत असल्याचा आरोप दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंदर यादव यांनी केला. पाण्याचा निचरा आणि इतर व्यवस्थेबाबत दिल्ली सरकारने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news