दिल्ली प्रदूषण: ग्रॅप-४ चे निर्बंध २ डिसेंबरपर्यंत कायम राहणार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या श्रेणीबद्ध उपाययोजनांचा चौथा टप्पा (ग्रॅप-४) २ डिसेंबरपर्यंत सुरुच राहील, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (दि.२८) दिले.
न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने सांगितले की, यादरम्यान, निर्बंध कमी करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग एक बैठक घेणार आहे. शाळा वगळता सर्व निर्बंध कायम राहतील. निर्बंधांनुसार दिल्लीत ट्रकचा प्रवेश रोखण्यात पूर्णपणे अपयश आल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.
प्रदूषणाच्या संकटावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या उद्देशाने वायू प्रदूषणाशी संबंधित प्रकरणाची सविस्तर सुनावणी सुरू ठेवणार असल्याचेही खंडपीठाने आज स्पष्ट केले. पराळी जाळणे, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ट्रक प्रवेश करणे आणि फटाक्यांवर बंदी यांसारख्या मुद्द्यांची तपासणी केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

