General Manoj Naravane: माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या पुस्तकातील माहिती लीक; दिल्लीमध्ये गुन्हा दाखल

Delhi Police FIR: माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे काही भाग लीक झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
General Manoj Naravane
General Manoj Naravanefile photo
Published on
Updated on

General Manoj Naravane

नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे काही भाग सोशल मीडियावर लीक झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी एफआयआर दाखल केला आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सोशल मीडियावर आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असलेल्या अशा माहितीची दिल्ली पोलिसांनी दखल घेतली आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की 'Four Stars of Destiny' नावाच्या पुस्तकाची प्री-प्रिंट प्रत सक्षम अधिकाऱ्यांच्या अनिवार्य मंजुरीशिवाय प्रसारित केली जात आहे."

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, "तपासात असे समोर आले आहे की, याच शीर्षकाखालील आणि मेसर्स पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेल्या एका टाईप केलेल्या पुस्तकाची पीडीएफ प्रत काही वेबसाइट्सवर उपलब्ध आहे. याशिवाय, काही ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्म्सनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ अशा प्रकारे प्रदर्शित केले आहे की जणू ते विक्रीसाठी उपलब्ध आहे."

या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी स्पेशल सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राहुल गांधींनी केला होता उल्लेख

गेल्या आठवड्यात लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या या पुस्तकाचा उल्लेख केल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या पुस्तकाच्या आधारे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला होता. या वादामुळे लोकसभेचे कामकाजही विस्कळीत झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news