

Delhi-Mumbai Expressway Accident
दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर आज सकाळी भीषण अपघात झाला. हरियाणातील नुहमध्ये इब्राहिमबास गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या पिक-अपने रस्त्याची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात सहा कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर आज सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर साफसफाईचे काम करत असताना काळाने घाला घातला. एकुण १० कर्मचारी होते, अचानक एक वेगवान पिकअप आली आणि त्यांना जोरदार धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की सहा कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या पाच कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा सुरू झाली. अपघाताची भीषणता इतकी होती की आजूबाजूचे लोकही थक्क झाले होते. मृतदेहांचे तुकडे तुकडे झाले होते, घटनास्थळावरील संपूर्ण रस्ता रक्ताने माखला होता. स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली. काही वेळातच रस्त्यावर मोठी गर्दी जमली. रुग्णवाहिका, रस्ता सुरक्षा एजन्सीची वाहने आणि पोलिस पथके घटनास्थळी पोहोचली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातामागील कारणांचा तपास सुरू असून पिकअप चालकावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या मदतीने अपघाताचा तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर होणाऱ्या अपघातांच्या मालिकेत या अपघाताची आणखी एक भर पडली आहे.