

HC On Afzal Guru Grave : तिहार तुरुंगातून काश्मिरी फुटीरतावादी नेता मकबूल भट्ट आणि अफझल गुरु यांच्या कबरी हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज (दि. २४) फेटाळून लावली. न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत, यासंदर्भातील निर्णय कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन सरकारने घ्यायचा आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
बार अँड बेंच दिलेल्या वृत्तानुसार, याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की तिहारमधील या कबरींमुळे तुरुंग कट्टरपंथीयांसाठी विशेष महत्त्वाचे स्थळ झाले आहे. कारागृहातील शिक्षा भोगत असलेले दहशतवादी येथे एकत्र येतात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येते, तसेच दहशतवादाला प्रोत्साहन मिळते. दहशतवादाचे उदात्तीकरण थांबविण्यासाठी मकबूल भट्ट आणि अफझल गुरु यांचे मृतदेह गोपनीय ठिकाणी हलवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.
न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या भूमिकेशी सहमती दर्शवली की, या कबरींना गौरवस्थळ बनवता येणार नाही. मात्र, खंडपीठाने स्पष्ट केले की, कोणत्याही स्थळाचे उदात्तीकरण केले जात आहे, असे म्हणण्यासाठी ठोस पुरावे असणे आवश्यक आहे आणि केवळ वृत्तपत्रांतील बातम्यांवर आधारित जनहित याचिका दाखल करता येणार नाही. आम्हाला प्रथमदर्शनी असे वाटत नाही की हा असा उपद्रव आहे, जो अधिकाऱ्यांनी दूर केला पाहिजे. यावर बंदी कुठे आहे? जर बंदी नसेल, तर न्यायालय त्यावर बंदी घालू शकते का? आम्ही धोरणकर्ते आहोत का? हे संबंधित अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे," असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी हा मुद्दा मांडण्यास विलंब केल्याचेही निदर्शनास आणत याचिका फेटाळली.