

Delhi Farmers Rally: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु असतानाच राजधानी दिल्लीत आज शेतकरी संघटनांकडून 'देश बचाओ मोर्चा' काढण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी पंजाबसह विविध राज्यांतून हजारो शेतकरी दिल्लीत दाखल होणार असल्याने शहरातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक कोंडी आणि मार्गांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ट्रॅफिक पोलिसांच्या माहितीनुसार, आज सकाळी 8.30 वाजल्यापासून परिस्थितीनुसार वाहतुकीवर निर्बंध आणि मार्ग वळविण्याची (Diversion) अंमलबजावणी केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी सत्याग्रह मार्ग, वेलोड्रोम रोड, राजघाट DTC डेपो रोड आणि या परिसरातील इतर जोडरस्त्यांवर वाहतुकीचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या मार्गांचा वापर शक्यतो टाळावा आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, विमानतळ किंवा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन नियोजित वेळेच्या आधीच घराबाहेर पडावे, अशी सूचनाही पोलिसांनी दिली आहे.
वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, वाहने केवळ अधिकृत पार्किंगमध्येच उभी करावीत आणि प्रवासादरम्यान रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्स मिळवण्यासाठी नेव्हिगेशन अॅपचा वापर करावा, असेही दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे शक्य होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
किसान मजदूर मोर्चा (KMM), संयुक्त किसान मोर्चा (SKM), भारतीय किसान युनियन (BKU) एकता संघर्ष आणि इतर शेतकरी संघटनांनी भारत-अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराच्या विरोधात ही महासभा आयोजित केली आहे. या करारामुळे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या हितावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा या संघटनांचा दावा आहे.
KMMचे नेते सरवन सिंह पंढेर यांनी देशभरातील शेतकरी, शेतमजूर आणि युवकांना या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पंजाबमधून हजारो शेतकरी दिल्लीत पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, दिल्लीतील किसान घाट येथे होणारी ही महासभा आणि आंदोलन सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे दिवसभर राजधानीतील काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करूनच प्रवास करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.