पुढारी ऑनलाईन डेस्क: बीआरएस नेत्या के. कविता यांच्या दि्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जामीन मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला नोटीस बजावली आहे. दरम्यान आज (दि.१२ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर पुढील सुनावणी मंगळवार २० ऑगस्ट रोजी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.
न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर के कविता यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी आज (दि.१२) पार पडली. यावेळी खंडपीठाने केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयला 'उत्तर द्या' नोटीस बजावली आहे.
दिल्ली उत्पादन शुल्काच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये जामीन मिळावा यासाठी भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के. कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात नियमित जामीन याचिका दाखल केली आहे. कविता यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि.१२ ऑगस्ट) केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांना नोटीस बजावली आहे.
के. कविता यांच्या बाजूने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, त्या गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात असून, जामिनासाठी पात्र आहेत. तसेच पुढे कविता यांची केस दिल्लीचे मुख्यमंत्री (सीएम) अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासारखीच आहे. अनुक्रमे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम आणि नियमित जामीन मंजूर केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली उच्च न्यायालयाने 1 जुलै रोजी बीआरएस नेत्या के.कविता यांनी दाखल केलेली जामीन याचिका फेटाळली. त्यानंतर त्यांनी अधिवक्ता पी मोहित राव यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करत याचिका दाखल केली. कविता यांनी ईडीने १५ मार्च रोजी हैदराबादमधून अटक केली होती. त्यानंतर ११ एप्रिल रोजी सीबीआयने तिला ताब्यात घेतले.
सीबीआय आणि ईडीने दावा केला आहे की, दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या संदर्भात लाचेची देवाणघेवाण आणि पैशाच्या लाँड्रिंगमध्ये त्यांचा सहभाग होता. ट्रायल कोर्टाने ६ मे रोजी सीबीआय आणि ईडी या दोन्ही प्रकरणांमध्ये के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला.
CBI आणि ED नुसार, दक्षिण भारतातील काही व्यक्ती/समूहांना या प्रक्रियेत फायदा झाला आणि त्यांच्या नफ्यातील काही रक्कम आम आदमी पार्टीला (AAP) देण्यात आली, ज्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्याचा वापर केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनेक राजकीय नेत्यांपैकी के. कविता या एक आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग (सध्या जामिनावर सुटलेले) आणि मनीष सिसोदिया (अलीकडेच जामीन मिळालेले) यांसारखे आप नेते यांचा समावेश आहे. या प्रकरणात ‘आप’लाही आरोपी करण्यात आले आहे.