

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील महरौली परिसरात शनिवारी रात्री उशिरा पाच मजली व्यावसायिक इमारत कोसळली. या दुर्घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असून ६ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि अन्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले होते. संबंधित इमारत व्यावसायिक वापरासाठी होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
ढिगाऱ्यातून आतापर्यंत काही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावलेल्या व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.
इमारत कोसळल्यानंतर तिचा मोठा भाग शेजारच्या इमारतींवर आणि परिसरातील एका कँटीनवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एनडीआरएफचे जवान अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ढिगारा हटवून शोधकार्य करत आहेत.
दरम्यान, परिसर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला असून नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. इमारत कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.