

नवी दिल्लीः दिल्लीतील साकेत, द्वारका आणि पटियाला हाऊस न्यायालय यासह सीआरपीएफ संचालित दोन शाळांना मंगळवारी सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. यानंतर न्यायालयाचा परिसर आणि शाळांना खाली करण्यात आले. मात्र, बॉम्बचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या तपासात धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले
दहशतवादी मॉड्यूलच्या नावाने पाठवलेल्या ईमेलमध्ये सकाळी न्यायालयाच्या परिसरात स्फोटके ठेवल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामुळे तात्काळ सुरक्षा सतर्कता वाढवण्यात आली. जिल्हा न्यायालय संकुलांची सुरक्षा चौकशी करण्यासाठी बॉम्ब निकामी पथक, श्वान पथक आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या अनेक पथकांना तैनात करण्यात आले होते. तपासानंतर सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) दिल्ली लाल किल्ला कार बॉम्बस्फोटातील आरोपी जसीर बिलाल वाणीला पटियाला हाऊस न्यायालयात हजर करणार होती. त्याअगोदर धमकीचा ईमेल सकाळी ११ वाजता आला होता. दिल्लीतील कार बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर सर्व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. या दरम्यान बॉम्बच्या धमकीने खळबळ उडाली होती.