

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणखी एका महत्त्वाच्या आरोपीला अटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेला हा नववा आरोपी असल्याची माहिती तपास संस्थेने दिली. यासिर अहमद दार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील शोपियान भागातील तो रहिवासी आहे. त्याला नवी दिल्ली येथून अटक केली असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने सांगितले.
यानंतर त्याला दिल्लीतील पतियाळा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपर्यंत एनआयए कोठडीत पाठवले. आरोपीची कोठडीत चौकशी करण्याची एनआयएची मागणी विशेष न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी मान्य करत त्याला कोठडी सुनावली.
१० नोव्हेंबर रोजी झालेल्या दिल्ली स्फोटामागील कटात यासिरने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, असे एनआयएने सांगितले. तो या कटात सक्रियपणे सहभागी होता आणि त्याने आत्मघाती हल्ला करण्याची शपथही घेतली होती. यासिर या प्रकरणातील इतर आरोपींशी सतत संपर्कात होता, ज्यात सुसाईड बॉम्बर उमर नबी याचा समावेश देखील होता.
दरम्यान, दिल्ली स्फोट प्रकरणात एनआयएने यापूर्वीच आठ जणांना अटक केली आहे. यात चार डॉक्टर - डॉ मुझम्मिल गनाई, डॉ. आदिल राथेर, डॉ शाहीन सईद आणि डॉ बिलाल नसीर मल्ला आणि मौलवी इरफान याचा समावेश आहे. अमीर रशीद अली आणि जासिर बिलाल वानी उर्फ दानिश या अन्य दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे.