

फरिदाबाद (हरियाणा) : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी अल फलाह विद्यापीठाच्या डझनभराहून अधिक वरिष्ठ डॉक्टरांवर संशयाची सुई आहे. विद्यापीठाच्या काही विभागप्रमुखांचादेखील यामध्ये समावेश असल्याचे समजते. सर्जरी आणि जनरल मेडिसीन विभागाचे वरिष्ठ डॉक्टर तपास संस्थांच्या ‘रडार’वर आहेत. यासह रुग्णालयातील पॅरामेडिकल कर्मचार्यांकडेही संशयाची सुई असल्याचे समजते. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेला बॉम्बस्फोट जितका भयानक होता, तितकाच मोठा घातपात फरिदाबाद पोलिसांच्या जलद, सतर्क आणि विवेकी कृतींमुळे टळला. दहशतवाद्यांनी साठवलेल्या स्फोटकांचा आणि शस्त्रांचा साठा वेळीच जप्त केला नसता, तर देशाचे मोठे नुकसान झाले असते. फरिदाबाद पोलिसांनी हजारो किलो अमोनियम नायट्रेट आणि एक अत्याधुनिक रायफल जप्त करून दहशतवाद्यांचा कट उधळून लावला, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर पोलिसांना एक महत्त्वपूर्ण यश मिळाले.
फरिदाबाद पोलिसांचे प्रवक्ते यशपाल यांनी दैनिक ‘पुढारी’ला सांगितले की, अमोनियम नायट्रेटचा वापर शेतीमध्ये खत म्हणून केला जातो, त्यामुळे त्याची खरेदी सामान्यतः संशयास्पद नसते. याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी कमी कमी प्रमाणात खत खरेदी करून मोठा साठा जमवला होता. त्यांनी स्पष्ट केले की, 30 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिस एका संशयितासाठी वॉरंट घेऊन फरिदाबादमध्ये पोहोचले. स्थानिक पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतले आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्वाधीन केले. नंतर, 8 नोव्हेंबर रोजी, चौकशीत शस्त्रास्त्रांचा साठा उघडकीस आला तेव्हा, पोलिसांचे एक पथक अल फलाह विद्यापीठात पोहोचले आणि त्यांनी अनेक शस्त्रे जप्त केली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट साठवल्याची माहिती मिळाली, ज्यामुळे फतेहपूर गावात छापा टाकण्यात आला आणि अंदाजे 3,000 किलोगॅ्रम अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले.
यशपाल यांच्या मते, जर हे साहित्य वेळेत जप्त केले नसते, तर मोठी घटना रोखणे अत्यंत कठीण झाले असते. त्यांनी सांगितले की, ‘एनआयए’ या प्रकरणाचा तपास करत आहे आणि तपासाची दिशा आणि व्याप्ती त्यांच्या अधिकार क्षेत्रात आहे. किती लोकांची चौकशी केली जात आहे आणि कोण संशयाच्या भोवर्यात आहे, हे फक्त तपास संस्थाच ठरवू शकते. ‘एनआयए’ला मदत करण्यासाठी हरियाणा पोलिसांनी एक विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले आहे. जेव्हा जेव्हा ‘एनआयए’ला कोणत्याही ठिकाणी, विशेषतः अल फलाह विद्यापीठात प्रवेश करायचा असतो किंवा छापा टाकायचा असतो, तेव्हा हरियाणा पोलिसांचे पथक ‘एनआयए’सोबत उपस्थित असते, असे त्यांनी सांगितले.
‘अल फलाह’बाहेरील औषधी दुकानदाराची खंत
‘अल फलाह’च्या गेटला लागून असलेले नूर औषधी दुकान विद्यापीठावरील संकटाचा सर्वात मूक साक्षीदार बनले आहे. दुकानाचे मालक इखलाक दारात उभे राहून दूरवर पाहत उभे आहेत. जणू काही ते एखाद्या जुन्या ओळखीच्या रुग्णाची वाट पाहत आहेत. पूर्वी, दिवसाला 20 ते 25 हजार रुपयांची औषधे विकली जात होती. आता, दिवसाला 2 हजार रुपयांचीदेखील विक्री होत नाही, असे ते म्हणाले. रुग्णालयात सुमारे 1,000 वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टर आहेत. त्यापैकी जवळपास 40 टक्के डॉक्टर आणि विद्यार्थी हे काश्मीरचे आहेत. एवढ्या सगळ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांमुळे वाटते की, ही जागा फक्त एक इमारत नव्हती, तर संपूर्ण परिसराची हृदयाची धडधड होती. एमबीबीएसचे 800 विद्यार्थी, 80-90 पदव्युत्तर विद्यार्थी. लॅब टेक्निशियन प्रशिक्षण, अशा सगळ्यांनी हा परिसर गजबजलेला असायचा. हे विद्यापीठ आणि रुग्णालय आजूबाजूच्या गावांसाठी एक वरदान होते. रुग्ण फक्त हरियाणामधूनच नव्हे, तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधूनदेखील येत असल्याचे इखलाक यांनी सांगितले. मात्र, दिल्ली बॉम्बस्फोटाचा संबंध विद्यापीठाशी जुळल्याचे समोर येताच या सर्वांना ब्रेक लागल्याचे ते म्हणाले.
दोन विभागांवर सर्वाधिक परिणाम
रुग्णालयाच्या जनरल मेडिसीन आणि सर्जरी या दोन विभागांवर सर्वात मोठा परिणाम झाला आहे. वरिष्ठ डॉक्टरांनी येणे बंद केले. जिथे एकेकाळी दररोज हजारो रुग्ण येत असत, आता जेमतेम पन्नास येतात. अल फलाह रुग्णालय सुरू आहे; पण त्याची नाडी बंद पडली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोनेरी भूतकाळ, प्रश्नांनी वेढलेला वर्तमान
1997 मध्ये एका लहान दवाखान्यापासून ‘अल फलाह’ची सुरुवात झाली. विद्यार्थी, कर्मचारी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी मूलभूत उपचार देणे हे अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टचे ध्येय होते. त्यानंतर, 2014 मध्ये, ते 378 खाटांच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाले. जानेवारी 2025 मध्ये, नवीन 650 खाटांच्या रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय स्वतः उपस्थित होते. आज त्याच इमारती उंच उभ्या आहेत; पण सगळीकडे शांतता आहे.
रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, रेडिओलॉजी, त्वचारोग, मानसोपचार, क्षयरोग, ईएनटी, दंत असे विभाग आहेत. रुग्णालयाच्या खोल्यांमधील दिवे चालू आहेत आणि बेड रिकामे आहेत. जणू काही रुग्णालय स्वतःच विचारत आहे की, ज्यांच्यासाठी हे बांधले गेले ते रुग्ण गेले कुठे? विद्यार्थी सुविधा केंद्रालाही त्याच दुःखाचा सामना करावा लागत आहे. जिथे एकेकाळी गणवेशांच्या रांगा होत्या, इंटरनेट कॅफेमध्ये गर्दी होती आणि आईस्क्रीम पार्लरमध्ये आवाज होता. आता तिथल्या खुर्च्या रिकाम्या आहेत. जणू काही कॅम्पसनेच स्वतःचा आवाज बंद केला आहे.
विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याचे अनेक बॉम्बस्फोटांमध्ये नाव
तपासात आणखी एक धक्कादायक दुवा उघड झाला आहे. मिर्झा शादाब बेग याने 2007 मध्ये येथून बी.टेक. पूर्ण केले. 2008 नंतर तो देश सोडून पळून गेला. त्याचे नाव अनेक बॉम्बस्फोटांशी जोडले गेले आहे. त्याचे ‘इंडियन मुजाहिद्दीन’शी संबंध आहेत. इंटरपोलने त्याच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केली आहे. विद्यापीठ हे सर्व निव्वळ योगायोग असल्याचा दावा करू शकते; परंतु प्रश्न कायम आहेत. या फक्त दुर्दैवी घटना आहेत की, त्यामागे काहीतरी खोलवर दडलेले आहे?