

दिल्ली विधानसभा परिसरात माकडांच्या उपद्रवावर उपाय म्हणून नवी योजना
वानरांचा आवाज काढणाऱ्या लोकांना तैनात करण्याचा निर्णय
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध
प्रत्येक कर्मचारी आठ तासांच्या शिफ्टमध्ये करणार काम
माकडांना पळवण्यासाठी आवाजाची नक्कल व प्रत्यक्ष वानराचाही वापर
वानरांचा आवाज काढणाऱ्यांना नोकरी मिळणार आहे. हे ऐकून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटले असेल; मात्र हे खरे आहे. दिल्ली विधानसभा परिसरात माकडांच्या वारंवार होणाऱ्या घुसखोरी आणि उपद्रवाच्या समस्येवर मात करण्यासाठी विधानसभा प्रशासनाने एक नवी युक्ती शोधली आहे. माकडांना पळवून लावण्यासाठी वानरांच्या आवाजाची नक्कल करणाऱ्या लोकांना तैनात करण्याची योजना आखण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) वानरांचा आवाज काढणाऱ्या व्यक्तींना कामावर घेण्यासाठी निविदाही काढली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यापूर्वीही वानरांची नक्कल करणारे कर्मचारी कार्यरत होते; मात्र त्यांचा करार संपला आहे.
आता प्रशासन कामकाजाच्या दिवशी तसेच शनिवारी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना तैनात करण्याची योजना आखत आहे. प्रत्येक कर्मचारी आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करणार आहे. हे कर्मचारी वानरांच्या आवाजाची नक्कल करून माकडांना परिसरातून पळवून लावतील. यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आपल्या सोबत एक वानरही आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे.