

Delhi Classroom Scam: कथित दारू घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन पुन्हा एका नवीन अडचणीत सापडले आहेत. कथित क्लासरूम घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेने (एसीबी) सरकारी शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या बांधण्यात 2000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारच्या काळात 12,748 वर्गखोल्या/इमारतींच्या बांधकामात 2000 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे, असे एसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. वर्गखोल्या बांधण्यासाठी मूळ खर्चापेक्षा पाचपट जास्त पैसे खर्च झाले. त्यांनी 34 कंत्राटदारांना काम दिले, त्यापैकी बहुतेक आम आदमी पक्षाशी संबंधित होते. हा प्रकल्प जून 2016 पर्यंत पूर्ण होणार होता, परंतु या प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
एसीबीचेने दिलेल्या माहितीनुसार, 12,748 वर्गखोल्या अधिक पैसे खर्च करून बांधण्यात आल्या. एसपीएस (सेमी पर्मनंट स्ट्रक्चर) चे आयुष्य फक्त 30 वर्षे आहे तर आरसीसीचे आयुष्य 75 वर्षे आहे. मात्र आरसीसीच्या खर्चामध्ये एसपीएस वर्गखोल्या बांधण्यात आल्या.
या कामासाठी योग्य प्रक्रिया न राबवता आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर सीव्हीसी (केंद्रीय दक्षता आयोग) च्या अहवालात प्रकल्पातील अनेक अनियमितता उघडकीस आल्या होत्या, परंतु हा अहवाल जवळजवळ तीन वर्षे दाबून ठेवण्यात आला होता.