पुढारी ऑनलाईन डेस्क: "नो आराम, आठवड्यातून ९० तास काम करा" एल ॲंड टी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 'घरी तुम्ही किती वेळ बायकोचं तोडं बघत राहाल'? असे म्हणत एसएन सुब्रह्मण्यम यांनी स्पर्धात्मक राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) येथील टाउन हॉल मीटिंगमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्याने सोशल मीडियावर पडसाद उमटत आहेत.
एसएन सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने संताप व्यक्त केला आहे. तिने "इतक्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीला हे शोभत नाही. त्यांचे हे विधान धक्कादायक आहे", असे तिने म्हटले आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांच्याकडूनदेखील सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
लार्सन अँड टुब्रोच्या (एल अँड टी) टाउन हॉल मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन कराताना, सुब्रह्मण्यम म्हणाले, "राष्ट्रहित प्रथम म्हणून आठवड्यातून ९० तास काम करा, रविवारीही काम करा. प्रथम स्थानावर जायचं असल्यास ९० तास काम करणे गरजेचं आहे. घरी राहून किती वेळा बायकोचे तोंड बघणार, रविवारीदेखील ड्युटी करा. रविवारी मी तुम्हाला कामावर ठेवू शकत नाही याचं मला वाईट वाटतं. मी हे करू शकलो तर नक्की करेन, कारण मी रविवारीदेखील काम करतो.'' असेही सुब्रह्मण्यम यांनी म्हटलं आहे.
एल अँड टीचे ६४ वर्षीय सीईओ एस. एन. सुब्रह्मण्यम (एसएनएस), जे २.२१ लाख कोटी रुपयांचे महसूल मिळवून देणाऱ्या महाकाय कंपनीचे प्रमुख आहेत. ते कर्मचाऱ्यांना रविवारी काम करण्याचे सुचवताना आणि वाढीव फुरसतीच्या वेळेच्या मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले. यापूर्वी इन्फोसिसचे सर्वेसर्वा एन. आर. नारायण मूर्ती यांनीदेखील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता.