पुढारी ऑनलाईन डेस्क: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे रुपांतर रेमल चक्रीवादळात झाले आहे. तसेच हे वादळ रविवारी (२६ मे) पहाटे बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे घेऊन येण्याची शक्यता (Cyclone Remal) आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.
IMD च्या मते, चक्रीवादळ रेमाल उत्तरेकडे आणि नंतर पूर्वेकडे सरकून शनिवारी सकाळपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ बनले आहे. त्यानंतर पुढे ते आणखी तीव्र होईल आणि शनिवारी रात्रीपर्यंत सागर बेट (भारत) आणि खेपुपारा (बांगलादेश) दरम्यानचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार (Cyclone Remal) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
रविवारी (दि.२६) तीव्र चक्रीवादळ रेमलच्या आगमनापूर्वी पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ त्याच्यासोबत अत्यंत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे आणेल आणि त्याचा ओडिशावरही परिणाम होण्याची शक्यता आहे, असेदेखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळ लँडफॉल होताना सुमारे 110-120 किलोमीटर प्रतितास (kmph) वाऱ्याचा वेग असणार आहे. ते जवळपास 135 किमी प्रतितास वेगाने होचण्याचा अंदाज वर्तवला आहे. रविवार (२६ मे) आणि सोमवारी (दि.२७ मे) पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सोमवार २७ मे ते मंगळवार २८ मे रोजी ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी (Cyclone Remal) होण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तली आहे.
रेमल चक्रीवादळ लँडफॉल दरम्यान पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारपट्टीवरील सखल भागांमध्ये १.५ मीटर पर्यंतच्या लाटांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाने मच्छिमारांना मंगळवारी २८ मेच्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
ओडिशा सरकारने केंद्रपारा, भद्रक, बालासोर आणि मयूरभंज या चार किनारपट्टी जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना वादळाच्या प्रभावाच्या अपेक्षेने पूर्वतयारी उपाययोजना करण्यासाठी सतर्क केले आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
'रेमल' हे बंगालच्या उपसागरातील या मोसमातील पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ आहे. उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांसाठी प्रादेशिक नामकरण प्रणालीचे अनुसरण करून ओमानने या चक्रीवादळाला 'रेमल' हे नाव दिले आहे.