

Cyclone Montha
हैदराबाद: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 'मोंथा' नावाचे तीव्र चक्रीवादळ आज पहाटे आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर कमकुवत झाले आहे. मात्र, किनाऱ्याला धडकण्यापूर्वी आणि धडकताच या वादळामुळे अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले असून, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
बुधवारी मध्यरात्रीनंतर हे चक्रीवादळ मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनाऱ्यावरून गेले. किनाऱ्याला धडकल्यामुळे त्याची तीव्रता हळूहळू कमी झाली.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पहाटे २:३० वाजता दिलेल्या माहितीनुसार, किनारी आंध्र प्रदेशावरील तीव्र चक्रीवादळ 'मोंथा' हे १० किमी प्रतितास वेगाने वायव्येकडे सरकले आणि आता ते साध्या चक्रीवादळात रूपांतरित होऊन कमकुवत झाले आहे.
हवामान विभागाने सांगितले की, जमिनीवर पुढे सरकल्यामुळे वादळ हळूहळू शक्ती गमावत आहे. सध्या हे वादळ नरसापूरच्या सुमारे २० किमी वायव्य-पश्चिमेस होते आणि मच्छलीपट्टणम व विशाखापट्टणम येथील रडारद्वारे यावर सतत लक्ष ठेवले जात आहे.
वादळ कमकुवत झाले असले तरी त्याचे परिणाम अजूनही जाणवत आहेत. चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकताच सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे मुळासकट पडली आणि काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला. प. गोदावरी, कृष्णा आणि पू. गोदावरी या जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार पाऊस आणि सोसाट्याचे वारे कायम आहेत. प्रशासनाने सखल भागांत पुराचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ कमकुवत झाले असले तरी त्याचे परिणाम पुढील काही दिवस तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत जाणवण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.