

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय रिजर्व्ह पोलिस बलाच्या (CRPF) एका जवानाने एका पाकिस्तानी मुलिशी लग्न केल्याची बाब समोर आली आहे. मुनीर अहमद असे त्या जवानाचे नाव असून तो सीआपीएफच्या ४१ व्या बटालियनचा सैनिक होता. हा प्रकार समोर आल्यानंतर त्याला तत्काळ प्रभावाने बडतर्फ करण्यात आले आहे. विषेश म्हणजे त्या मुलीबरोबर फोनवरुन व्हिडीओ कॉल करत लग्न केले होते. मेनल खान असे त्या लग्न झालेल्या पाकिस्तानी मुलीचे नाव आहे.
मुनीर अहमदने मुस्लिम मुलीशी लग्न केल्याची बाब लपवून ठेवली होती. त्यामुळे त्याला सुरक्षा नियमांचे उल्लघंन केल्याच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच त्याच्या पत्नीची विसाची मुदत संपली आहे तरी त्याने तिला आपल्यासोबत भारतातच ठेवले आहे असाही आरोप त्याच्यावर आहे.
सीआरपीएफकडून करण्यात आलेल्या अंतर्गत चौकशीत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जवान मुनीर अहमदने आपल्या लग्नाची माहिती गुप्त ठेवली होती. इतकेच नव्हे तर, त्याच्या पत्नीने भारतात अधिक काळ वास्तव्यासाठी राहिल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना न दिल्याचेही आढळून आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे वर्तन सेवाशिस्तीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असून त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
पहलगाम हल्ल्यानंतर ही घटना समोर आल्याने मुनीर अहमदला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबत सीआरपीएफने स्पष्टपणे सांगितलं आहे की, सुरक्षा दलामधील प्रत्येक कर्मचाऱ्यांने सेवा शर्तींचं पालन करणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असते.
२४ मे २०२४ रोजी एक व्हिडीओ कॉल करत या जवानाने पाकिस्तानी मुलीशी लग्न केले होते. याबाबत अधिक चौकशी केली असता संबधित मुलीला भारतात राहण्यासाठी त्यावेळी परवाणगी दिली नव्हती. पण ती मार्च २०२५मध्ये शॉर्ट टर्म विसावर भारतात आली होती त्याची मुदत २२ मार्च रोजी संपली होती पण तरी सुद्धा मेनल खान भारतात बेकायदेशीर रित्या राहत होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यावेळी या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. अधिकाऱ्यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा अहमद व मेनल खान यांच्या विवाहाची माहिती कळून आली. दरम्यान मेनल खान हिने विसाची मुदत वाढावी यासाठी अर्ज केला आहे. पण तो अजूनही प्रलंबित आहे.