CP Radhakrishnan: सी.पी. राधाकृष्णन आज घेणार उपराष्ट्रपती पदाची शपथ
CP Radhakrishnan
नवी दिल्ली : सी.पी. राधाकृष्णन आज (दि. १२) उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. सकाळी १० वाजता राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राधाकृष्णन यांना शपथ देतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव करून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. २१ जुलै रोजी जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर, ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीसाठी निवडणूक झाली होती.
महाराष्ट्र राज्यपाल पदाचा दिला राजीनामा
उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. देवव्रत आता दोन्ही राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळतील.
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर झाली मध्यावधी निवडणूक
संसदेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता, जरी त्यांचा कार्यकाळ अजून दोन वर्षे बाकी होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे मध्यावधी निवडणूक घेणे आवश्यक झाले.
