

CP Radhakrishnan Vice President Candidate
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी एका महत्त्वाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. मूळचे तामिळनाडूचे असलेले सी. पी. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. यापूर्वी त्यांनी झारखंड, पाँडिचेरी, तेलंगणा यासारख्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या रूपाने भाजपने दक्षिण भारतातील व्यक्तीला उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर केली.
रविवारी संध्याकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या एका महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर जे. पी. नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी संदर्भात आम्ही सर्वांशी चर्चा केली आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून एनडीएचे उमेदवार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यापूर्वी झारखंड, पाँडिचेरी, तेलंगणा यासारख्या राज्यांमध्ये राज्यपाल राहिले आहेत. दोनदा कोइंबतूरमधून लोकसभेवर देखील निवडून आले आहेत. पक्ष संघटनेत तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. केरळ भाजपचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांना झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. नंतर १९ मार्च २०२४ रोजी त्यांना तेलंगणा आणि पुद्दुचेरीचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर २७ जुलै २०२४ रोजी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करण्यात आले.
उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार कोण असतील, यावर अनेक दिवस चर्चा सुरू होती. रविवारी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड करत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आगामी काळात तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक आहे. सी. पी. राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूचे आहेत. अनेक वर्ष भाजपसोबत एकनिष्ठ आहेत. त्यांच्या रूपाने भाजपने दक्षिण भारतातील व्यक्तीला उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर केले. स्वाभाविकच दक्षिण भारतात या माध्यमातून चांगला संदेश जाईल. यानिमित्ताने भाजपला दक्षिण भारतात पाय आणखी घट्ट करता येईल.