कोविड रुग्णांची किडनीही प्रत्यारोपणासाठी सुरक्षितच!

कोविड रुग्णांची किडनीही प्रत्यारोपणासाठी सुरक्षितच!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  कोविडचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची किडनीही प्रत्यारोपणासाठी सुरक्षित असते आणि अशा किडनीचे प्रत्यारोपण केले तर यामुळे कोणताही प्रादुर्भाव होत नाही, असे निरीक्षण एका अभ्यासातून नोंदवले गेले आहे. कोविड – १९ च्या महामारीनंतर हजारो किडनींचे प्रत्यारोपण केले गेले असून कोरोनाग्रस्तांच्या किडनीचे प्रत्यारोपण केल्यानंतरही यातील एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला नाही, असा दावा यात केला गेला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या व नंतर मृत पावलेल्या अनेक व्यक्तींनी किडनी दान केले. यातील बरेच जण कोविड- १९ ने नव्हे तर अन्य कारणांनी मृत पावले. पण अगदी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर केवळ आठवडाभरातच मृत झालेल्या रुग्णांच्या किडनीचे प्रत्यारोपण केले तरी कोणत्याही प्रकारचा संसर्ग झालेला दिसून आलेला नाही, असे या अभ्यासात म्हटले आहे. जामा नेटवर्क ओपन या जर्नलमध्ये याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कोविड-१९ महामारीच्या कालावधीत अवयवदानाचे प्रमाण बरेच घटले आणि अगदी किडनी प्रत्यारोपणाची टक्केवारीदेखील कमी झाली होती. अमेरिकेत तर प्रत्यारोपणाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत खाली घसरले होते. सर्व अवयवदानात ही सर्वात मोठी घट होती आणि अवयव प्रत्यारोपणात संसर्गाची भीती, हेच त्यामागील मुख्य कारण होते. आता कोरोना कालावधीत जे पॉझिटिव्ह आले, त्यांना कोणत्याही अवयवदानाची परवानगी नव्हती. कोविडग्रस्तांच्या अवयवाचे प्रत्यारोपण केले गेले तर आपल्यालाही संसर्ग होऊ शकतो, अशी भीती त्यावेळी रुजली होती. आता मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे.

…त्यावेळी भीतीने कोविडग्रस्तांची किडनीच वापरली जात नसे!

एखाद्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आणि त्यानंतर एका आठवड्याच्या आतच ती व्यक्ती दगावली तर अशा वेळी दान केलेल्या किडनीचे प्रत्यारोपण केले जात नसे. पण कोविड महामारी ओसरल्यानंतर प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढत चालले असून यातील नाहक भीतीदेखील आता कमी होत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी हिपॅटायटिस सी रुग्णांचे अवयव प्रत्यारोपण केले जात होते. पण, ज्या व्यक्तीवर प्रत्यारोपण करायचे आहे, ती व्यक्तीही हिपॅटायटिस सी पॉझिटिव्ह असेल तरच प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला जात होता. आता मात्र या परिस्थितीतही बदल होत असल्याचे चित्र आहे.

कोविड-१९ चे पर्व ओसरत असताना आम्हाला असे आढळून आले आहे की, कोविडग्रस्तांच्या किडनीचे प्रत्यारोपण केले तरी त्या माध्यमातून संसर्ग होण्याची • किंचितही शक्यता असत नाही. कोरोनाग्रस्ताने दान केलेल्या किडनीचे प्रत्यारोपण केले म्हणून संसर्ग झाला, अशी एकही केस आम्ही आतापर्यंत पाहिलेली नाही.
– टॅरेक अॅल्हमद, वॉशिंग्टन विद्यापीठातील प्रत्यारोपण नेफ्रॉलॉजीचे वैद्यकीय संचालक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news