

Cough syrup row
भोपाळ : मध्य प्रदेशात खोकल्याचे दूषित औषध प्यायल्याने ११ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी छिंदवाडा पोलिसांनी बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना अटक केली आहे. तसेच, सिरप बनवणाऱ्या तामिळनाडू येथील कंपनीच्या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या या सिरपमुळे पाच वर्षांखालील मुलांचे मूत्रपिंड निकामी झाले.
रविवारी पहाटे परासिया पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. स्रेसन फार्मास्युटिकल्स या तामिळनाडूतील औषध उत्पादक कंपनीसह स्थानिक बालरोगतज्ञ डॉ. सोनी यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या १०५ आणि २७६ कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सामुदायिक आरोग्य केंद्राचे खंड वैद्यकीय अधिकारी (BMO) डॉ. अंकित सहलम यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, मुलांना देण्यात आलेल्या औषधाच्या नमुन्यांमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल (DEG) हे विषारी रसायन मोठ्या प्रमाणात आढळले आहे. हे रसायन अँटीफ्रीझ आणि ब्रेक फ्लुइड्समध्ये वापरले जाते.
तामिळनाडू आणि भोपाळ येथील सरकारी प्रयोगशाळांच्या अहवालातून ही भेसळ सिद्ध झाली आहे. प्रयोगशाळेच्या चाचणीत औषधाच्या नमुन्यात ४६ ते ४८ टक्क्यांहून अधिक 'डीईजी' रसायन आढळले. त्यामुळे औषध आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे दोन्ही अहवालांमध्ये स्पष्ट केले.
पाच वर्षांखालील या मुलांना सर्दी, खोकला आणि तापावर डॉ. प्रवीण सोनी यांनी 'कोल्ड्रिफ' सिरप लिहून दिले होते. सिरप घेतल्यानंतर काही दिवसांतच त्यांना लघवी कमी होणे, किडनी निकामी होणे अशी लक्षणे दिसू लागली. यापैकी दहा मुलांचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोन वर्षांखालील मुलांना खोकला (कफ) आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.