

भोपाळ: मध्य प्रदेशातील २३ बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कफ सिरपचा वाद आणखी चिघळला आहे. 'कोल्ड्रीफ' (Coldrif) या कफ सिरपच्या समान बॅचमधील दुसऱ्या बाटलीमध्येही विषारी डायथिलीन ग्लायकोलचे उच्च प्रमाण सापडल्याची माहिती मध्य प्रदेश अन्न व औषध प्रशासनाने (MPFDA) शुक्रवारी दिली.
जिल्हा स्तरावरील एफडीए अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या या नमुन्यामध्ये आढळलेले विषारी केमिकल्स पूर्वीच्या निष्कर्षांशी जुळणारे आहे. या गंभीर निष्कर्षांनंतर, अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून औषध निरीक्षकांना वैद्यकीय दुकानांची कसून तपासणी करण्याचे तातडीने निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने 'कोल्ड्रीफ', 'रेस्पीफ्रेश' (Respifresh) आणि 'रिलीफ' (Relife) या तीन कफ सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घातली असून त्यांना बाजारातून परत घेण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे.
'कोल्ड्रीफ' हे औषध केवळ छिंदवाडा आणि जवळपासच्या भागांमध्ये वितरित झाले होते. अंदाजे ६६० बाटल्यांपैकी बहुतेक बाटल्या आतापर्यंत परत मिळवण्यात आल्या आहेत. 'रेस्पीफ्रेश' (६,५२८ बाटल्या) आणि 'रिलीफ' (१,४०० बाटल्या) मात्र भोपाळमधून ३० ते ३५ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वितरित झाले आहे.
नागपूरमध्ये दोन मुले अजूनही गंभीर
विषारी कफ सिरप प्यायल्यामुळे एम्स (AIIMS) नागपूर येथे दाखल असलेल्या मध्य प्रदेशातील दोन मुलांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. दुसरीकडे, छिंदवाडा येथील दोन वर्षांचा प्रतीक पवार हा ४५ दिवसांच्या उपचारानंतर बरा झाला आहे.