

नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने २०२३ मधील गुन्ह्यांचा अहवाल जारी केला. यामध्ये विविध गुन्ह्यांची आकडेवारी जारी केली आहे. अहवालानुसार, भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असून कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, देशभरातील भ्रष्टाचार घटला असून महाराष्ट्रातील भ्रष्टाचार वाढला आहे.
अहवालानुसार, २०२३ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार, देशात २०२३ मध्ये भ्रष्टाचाराची एकूण ४ हजार ६९ गुन्हे नोंदवली गेली आहेत. तर २०२२ मध्ये देशात ४ हजार १३९ गुन्हे नोंदवले गेले होते. या तुलनेत २०२३ मध्ये महाराष्ट्रात एकूण ८१३ गुन्हे नोंदवली गेली आहेत. २०२१ आणि २०२२ मध्ये देखील महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये देशात पहिल्या स्थानावरच होता. मात्र गुन्ह्यांची संख्या कमी होती. २०२१ मध्ये ७७३ आणि २०२२ मधे ७४९ गुन्हे नोंदवली गेली होती, असे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये भ्रष्टाचाराचे ३६२ गुन्हे नोंदवली गेली आहेत. तर तिसऱ्या स्थानावर राजस्थान ३१७ आणि तामिळनाडू ३०२ आहेत.
चार राज्यांत 'शून्य' भ्रष्टाचार
छत्तीसगड, गोवा, मणिपूर आणि त्रिपुरा या चार राज्यांमध्ये २०२३ या वर्षात भ्रष्टाचाराचे ते काही प्रकरण नोंदवले गेले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. तर नागालँड आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्ये प्रत्येकी एक गुन्हा नोंदवला गेले आहे.
७१ टक्के गुन्हेगारांना रंगेहाथ पकडले
देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांपैकी ७१% (२,८७५) सापळा रचून नोंदवण्यात आली आहे. यामध्ये संशयितांना लाच घेताना रांगेहाथ पकडण्यात आले होते.
केंद्रशासित प्रदेशांत जम्मू आणि काश्मीर अव्वल
भ्रष्टाचार करण्यात ८ केंद्रशासित प्रदेशांत जम्मू आणि काश्मीर पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये भ्रष्टाचाराचे ६२ गुन्हे नोंदवले आहेत. तर २०२२ मध्ये ही संख्या १२८ होती. केंद्रशासित प्रदेशांमध्ये १९ गुन्ह्यांसह दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ मधे सर्व ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये भ्रष्टाचाराचे एकूण १०० गुन्हे नोंदवले गेले आहेत.