

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये बेतिया शहरातील पोलीस लाईन परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. एका पोलिस कॉन्स्टेबलने त्याच्या सहकारी कॉन्स्टेबलची ११ गोळ्या झाडून हत्या केली. सोनू कुमार असे मृत कॉन्स्टेबलचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी कॉन्स्टेबल परमजीतला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही थरारक घटना पोलीस लाईनमध्ये सर्वांच्या डोळ्यांसमोरच घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल परमजीत आणि त्याचा सहकारी पोलिस कॉन्स्टेबल सोनू कुमार यांच्यात काहीतरी कारणावरून जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की, परमजीत याने सर्व्हिस रायफल काढली आणि सोनू कुमारवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. चेहऱ्यावर एकामागून एक ११ गोळ्या झाडल्याने सोनूचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पोलिसांनी सांगितले की परमजीतने २० पेक्षा जास्त फायरिंग राउंड केले. काही दिवसांपूर्वी दोघांचीही सिक्टा पोलीस स्टेशनमधून बेतिया पोलीस लाईनमध्ये बदली झाली होती आणि त्यांना त्याच युनिटमध्ये तैनात करण्यात आले होते.
या घटनेनंतर कॉन्स्टेबल परमजीत रायफल घेऊन पोलीस लाईनच्या छतावर चढला. त्यामुळे पोलिसांना त्याला नियंत्रित करणे कठीण झाले. नंतर, पोलिसांनी त्याला अटक केली. घटनेची माहिती मिळताच चंपारण रेंजचे डीआयजी हरकिशोर राय घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. मृत कॉन्स्टेबल सोनू कुमारचा मृतदेह सध्या पोलिस बॅरेकमध्ये आहे. तर परमजीतची एसडीपीओ विवेक दीप मुफस्सिल पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.