

आगामी काळात तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पॉडिचेरी या पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच पक्ष नेतृत्वात बदल करून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा काँग्रेसचा मानस आहे.
Congress Organizational Changes
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने नुकतेच बिहारचे नेते नितीन नवीन यांची 'राष्ट्रीय कार्याध्यक्ष' पदी नियुक्ती करून सर्वांनाच धक्का दिला. आता भाजपच्या याच पावलावर पाऊल टाकत काँग्रेसमध्येही मोठ्या संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुका आणि त्यापूर्वी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, काँग्रेस पक्ष आता तरुण अध्यक्षाबाबत विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
'पुढारी न्यूज'चे शिवाजी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त्यांचे वय आणि प्रकृती स्वास्थ्य लक्षात घेता २०२९ च्या निवडणुकीपर्यंत त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पक्षाला एका तरुण चेहऱ्याची गरज भासत आहे. भाजपने जे.पी. नड्डा यांच्यासोबत नितीन नवीन यांना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्त केले. आता हेच मॉडेल काँग्रेस राबवू शकते. भाजपप्रमाणेच 'राष्ट्रीय कार्याध्यक्ष' हे नवीन पद निर्माण करण्याबाबत काँग्रेस श्रेष्ठींमध्ये गंभीर चर्चा सुरू आहे."
महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन पायलट यांचे नाव या पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहे. सचिन पायलट यांना राष्ट्रीय राजकारणात आणल्यास राजस्थानमधील अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटण्यास मदत होईल. पायलट यांची दिल्लीच्या राजकारणात मोठी भूमिका निश्चित करण्यासाठी त्यांना हे पद दिले जाऊ शकते. तसेच कर्नाटकचे मंत्री आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांच्या नावाचाही विचार सुरू आहे.
आगामी काळात तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पॉडिचेरी या पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच पक्ष नेतृत्वात बदल करून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा काँग्रेसचा मानस आहे. अनुभवी नेतृत्वाला तरुणाच्या उत्साहाची जोड देऊन भाजपच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याची चर्चा आहे.