

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस आजपासून २४ एप्रिल पर्यंत देशभरातील ५७ शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात भाजपकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाश करणे हा यामागील उद्देश आहे, असे काँग्रेस मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी रविवारी सांगितले.
नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात दोन्ही नेत्यांची नावे समाविष्ट झाल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने आपले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.
पी चिदंबरम दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याच वेळी, शशी थरूर लक्षद्वीपमध्ये पत्रकारांना संबोधित करतील. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत शिमला येथे, गौरव गोगोई जोरहाट येथे, सय्यद नसीर हुसेन गोव्यात, पृथ्वीराज चव्हाण बेळगाव येथे, मनीष तिवारी चंदीगड येथे आणि प्रणव झा धर्मशाळेत पत्रकार परिषद घेतील. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल भुवनेश्वरमध्ये, कुमारी सेलजा भोपाळमध्ये, दीपेंद्र हुडा कोचीमध्ये, कन्हैया कुमार जयपूरमध्ये, अमिताभ दुबे कोईम्बतूरमध्ये, तारिक अन्वर लखनऊमध्ये, राजीव शुक्ला सहारनपूरमध्ये आणि अलका लांबा वाराणसीमध्ये पत्रकारांना संबोधित करतील.