काँग्रेसला 39 वर्षांपूर्वीचे ’ते’ बिल भरावे लागणार
लखनौ : जाहीर सभांसाठी सरकारी बसेसचा वापर राजकीय पक्षांकडून सर्रास केला जातो. याचा त्रास सामान्य जनतेलाही सहन करावा लागतो. मात्र, राजकीय पक्षांना त्याचे काहीच वाटत नाही. आता अलाहबादच्या न्यायालयाने उत्तर प्रदेश काँग्रेसला 39 वर्षांपूर्वी सरकारी बसेस वापरल्याबद्दल 2 कोटी 66 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांची ने-आण करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस काँग्रेसने भाडेपट्ट्यावर घेतल्या होत्या. मात्र, नंतरच्या काळात अनेक सरकारे आली आणि गेली तरी हे बिल भरले गेले नव्हते. 10 नोव्हेंबर 1998 रोजी हा विषय पुन्हा ऐरणीवर आला असता, काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि पैसे वसुलीला स्थगिती मिळवली. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित होते.

