

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा कधीही आदर केला नाही. गांधी परिवाराबाहेरील कोणत्याही नेत्याचा त्यांनी कधीही आदर केला नाही, हा काँग्रेसचा इतिहास असल्याचे त्रिवेदी म्हणाले. किमान आजच्या या दुःखाच्या प्रसंगी राजकारण टाळले पाहिजे, असे ते म्हणाले. मोदी सरकारने माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, मदन मोहन मालवीय आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन पक्षीय संबंधांचा विचार न करता सर्व नेत्यांचा आदर केला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचा त्यांच्या हयातीत कधीही आदर न करणारा काँग्रेस पक्ष आज त्यांच्या मृत्यूनंतरही राजकारण करताना दिसत आहे, हे खेदजनक आहे. भाजप खासदार पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळाने दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारक आणि समाधीचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना कळवले आहे. ज्यांनी देशाच्या आर्थिक विकासाचा मोठा पाया रचला, त्यांचा आदर करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एनडीए सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे लक्षात घेऊन काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्मारक आणि समाधी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले.