

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग पंचतत्त्वात विलीन होताच राजकीय पक्षांनी राजकारण सुरू केले आहे. स्मशान स्थळाबाबत काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील पहिल्या शीख पंतप्रधानांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याचवेळी आम आदमी पक्ष (आप) आणि इतर विरोधी पक्षांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधींनी केंद्र सरकारवर मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे. ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते, त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे आजही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देत आहेत. आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंत्यसंस्कार अशा ठिकाणी करण्यात आले जिथे समाधीस्थळ करता येईल. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली अर्पण करता येईल. डॉ. मनमोहन सिंग हे सर्वोच्च सन्मानाचे आणि समाधीस्थळाचे हक्कदार आहेत. देशाच्या या महान सुपुत्राबद्दल आणि त्यांच्या गौरवशाली समाजाबद्दल सरकारने आदर दाखवायला हवा होता, असे राहुल गांधी म्हणाले.
याआधी शुक्रवारी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि समाधीसाठी स्थळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ.मनमोहन सिंग यांची समाधीसाठी सरकारने सहमती दर्शवली आहे. जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
दुसरीकडे, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या सूरात सूर मिळवला. ते म्हणाले की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंतिम संस्कार निगम बोध घाट येथे करण्यात आले. हे ऐकून मला धक्काच बसला. याआधी भारताच्या सर्व पंतप्रधानांवर राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख समाजातून जगभर प्रसिद्ध असलेले आणि १० वर्षे भारताचे पंतप्रधान असलेले डॉ.मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि समाधीसाठी भाजप सरकार जमीनही देऊ शकले नाही का? असा सवाल केजरीवाल यांनी केला.