

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनांवर हल्ला चढवल्यानंतर काँग्रेसच्या संपूर्ण टीमने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत हल्ला परतवून लावला आहे. पक्षाचे विद्यमान मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांपासून ते खुद्द काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी सोशल मीडियावर मोदी सरकारला खोटेपणा, छळ, कपट, लूट आणि प्रचार ही ५ विशेषणे दिली. ते म्हणाले की, १०० दिवसांच्या योजनेबद्दल तुमचा ढोल-ताशा हा स्वस्त पीआर स्टंट होता. १६ मे २०२४ रोजी तुम्ही २०४७ च्या रोड मॅपसाठी २० लाखांहून अधिक लोकांकडून इनपुट घेतल्याचा दावाही केला होता. पंतप्रधान कार्यालाकडे दाखल केलेल्या आरटीआयने तुमचे खोटे उघड केले आणि तपशील देण्यास नकार दिला. भाजपमध्ये 'बी' म्हणजे विश्वासघात, तर 'ज' म्हणजे जुमला, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले, पण तेही फसले. भारतातील बेरोजगारीचा दर ४५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर का आहे, असा प्रश्न खर्गे यांनी विचारला. मूठभर नोकऱ्यांसाठी जिथे जागा रिक्त आहेत तिथे चेंगराचेंगरी का दिसते? ७ वर्षात ७० पेपरफुटीला जबाबदार कोण? असाही प्रश्न काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी विचारला.
खर्गे यांच्यासह हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
भाजपपाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी सोशल मीडिया साईटवर म्हणाले की, प्रचारात लोकांना आश्वासन देणे सोपे असते मात्र त्यांना लागू करणे हे कठीण किंवा अशक्य असते. काँग्रेसची लोक प्रचाराच्या वेळी लोकांना अशी आश्वासने देतात की त्यांनाही माहिती असते की ते कधीही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आता त्यांचा बुरखा आता फाटला आहे.