

Comedian Munawar Faruqui :
दिल्लीतील जैतपूर - दालिंदी कुंज रोडवर दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेल टीमनं दोन शार्प शूटर्सना अटक केली. अटक करण्यात आलेले गुन्हेगार राहुल आणि साहिल हे हरियाणाच्या पानीपत आणि भिवानीचे राहणारे आहेत. राहुल हा यमुनानगरमधील २०२४ च्या ट्रिपल मर्डर केसमध्ये सामील होता. तो फरार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार कॉमेडियन मनव्वर फारूकी हा देखील या दोन शार्प शूटर्सच्या रडारवर होता.
विदेशात बसलेल्या गँगस्टर रोहित गोदारा, गोल्डी ब्रार आणि वीरेंदर चारण यांच्या सांगण्यावरून मुनव्वरची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या दोन शार्प शूटर्सना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक आरोपी २०२४ मधील ट्रिपल मर्डर केसमध्ये फरार होता, तर दुसऱ्या आरोपीने मुंबई आणि बंगळूरमध्ये लक्ष्याचा (Target) शोध घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगारी कटाचे मुख्य लक्ष्य (Target) प्रसिद्ध कॉमेडियन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा होता. या शूटर्सनी मुनव्वरला मारण्याच्या उद्देशाने मुंबई आणि बंगळूर या दोन्ही शहरांमध्ये त्याच्या हालचालींची रेकी केली होती.
मात्र, वेळीच केलेल्या कारवाईमुळे पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला. दोन्ही आरोपींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, घटनास्थळावरून त्यांच्याजवळील शस्त्रे आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.