

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पेपरफुटीविरोधी आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी भेट देत त्यांनी सोनम वांगचुक आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेतली तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना संजय सिंह म्हणाले की, पेपरफुटीचा प्रश्न हा देशातील कोट्यवधी युवकांच्या भवितव्याशी संबंधित असून सरकारने त्याबाबत उत्तर द्यावे. सात दिवसांपासून उपोषण करणारे सोनम वांगचुक हे ५९ वर्षांचे असून, या वयातही ते युवकांच्या भवितव्यासाठी लढत आहेत. त्यामुळे देशातील युवकांनीही या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि आंदोलनात सहभागी युवकांचेही त्यांनी कौतुक केले. देशात वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, मेहनत करणाऱ्या युवकांच्या स्वप्नांशी खेळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही लढाई केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित नसून, भरती प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व प्रस्थापित करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक विद्यार्थ्याने या आंदोलनाचा उद्देश समजून शांततापूर्ण पद्धतीने त्याला पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
संजय सिंह यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. आंदोलन करणाऱ्या युवकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली. पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नावर राजकारणापलीकडे जाऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. संसदेचे आगामी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधक पेपरफुटी आणि युवकांच्या मागण्यांचा मुद्दा ठळकपणे उपस्थित करतील, अशी ग्वाही संजय सिंह यांनी दिली. सरकारने वेळेत तोडगा काढला नाही, तर संसदेत आणि संसदेबाहेरही हा मुद्दा लावून धरला जाईल, असे ते म्हणाले. युवकांच्या हितासाठी प्रत्येक लोकशाही व्यासपीठावर संघर्ष सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.