पुढारी ऑनलाईन डेस्क: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी नवविवाहित जोडप्यांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालावी, असे आवहन केले आहे. दरम्यान, स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, "आता वेळ आली आहे की, नवविवाहित जोडप्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यात एकूण १६ मुलं जन्माला घालावीत". (CM Stalin on Children)
चेन्नईमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त बोलताना मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, आता नवविवाहित जोडप्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात १६ प्रकारच्या संपत्ती निर्मितीऐवजी १६ मुलं होण्याची वेळ आली आहे. म्हणूनच कलैगनर यांनी पराशक्ती चित्रपटात एक संवाद लिहिला होता, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, आम्ही मंदिरांच्या विरोधात नाही, तर मंदिरे भयानक माणसांची छावण्या बनण्याच्या विरोधात आहोत. आमची लोकसंख्या कमी होत आहे ज्यामुळे आमच्या लोकसभेच्या जागांवरही परिणाम होईल, मग आम्ही प्रत्येकी १६ मुलं का निर्माण करत नाही? , असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दावा केला की, पूर्वीचे वडीलधारी लोक नवविवाहित जोडप्यांना अनेक प्रकारची मालमत्ता मिळवण्यासाठी आशीर्वाद देत असत. जेव्हा वडिलधारी लोक म्हणायचे की तुम्हाला १६ मुले असावीत आणि समृद्ध जीवन जगावे, तेव्हा त्याचा अर्थ १६ मुले नसून १६ प्रकारची मालमत्ता होती. ज्याचा उल्लेख लेखक विश्वनाथन यांनी त्यांच्या पुस्तकात गाय, घर, पत्नी, मुले, शिक्षण, जिज्ञासा, ज्ञान, शिस्त, जमीन, पाणी, वय, वाहन, सोने, संपत्ती, पीक आणि स्तुती या स्वरूपात केला आहे; परंतु आता कोणीही तुम्हाला १६ प्रकारची संपत्ती मिळवण्याचा आशीर्वाद देत नाही मुले आणि एक समृद्ध जीवन जगणे हाच आशीर्वाद देतात, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी रविवारी (दि.२० आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वाढत्या वृद्धत्वाबाबत चिंता व्यक्त केली होती. या संदर्भात वाढत्या चिंतेचा हवाला देत त्यांनी दक्षिणेकडील राज्यांतील कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश राखण्यासाठी प्रदेशातील तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज नायडू यांनी व्यक्त केली. "दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता याव्यात यासाठी कायदा आणण्याची सरकारची योजना आहे," असे देखील नायडू यांनी जाहीर केले आहे.