

Durgapur gang rape case : पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना धक्कादायक आहे; या घटनेत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस इतरांचा शोध घेत आहेत; कोणालाही सोडले जाणार नाही. पीडित तरुणी एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती, ती रात्री १२:३० वाजता कशी बाहेर आली याचा तपास करणे ही खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी आहे, असे प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (दि.१२) माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, माझी मुलगी अंथरुणाला खिळलेली आहे. तिला ओडिशात सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पीडित तरुणीच्या वडिलांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.
मुलगी एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. ती रात्री १२:३० वाजता कशी बाहेर आली याचा तपास करणे ही खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी आहे. माझ्या माहितीनुसार, हे जंगली परिसरात घडले, म्हणून सकाळी १२:३० वाजता, मला काय घडले हे माहित नाही. तपास सुरू आहे. पोलिस चौकशी करत आहेत. दोषींवर कठोर शिक्षा केली जाईल, अशी ग्वाहीही ममता बॅनर्जी यांनी दिली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणावरील विरोधकांच्या हल्ल्यावर प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, "मला सांगा, तीन आठवड्यांपूर्वी ओडिशातील समुद्रकिनाऱ्यावर तीन मुलींवर बलात्कार झाला होता. ओडिशा सरकारने काय कारवाई केली? जर बंगालमधील महिलांवर काही घडले तर आम्ही ती सामान्य घटना मानत नाही; ती एक गंभीर बाब आहे. इतर राज्यांमध्येही असे घडले तरी ते निषेधार्ह आहे. आम्ही उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये असे अनेक प्रकार पाहिले आहेत, म्हणून सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरण १४ महिन्यांपूर्वी घडले होते. आता राज्यात पुन्हा एकदा अशीच संतापजनक घटना समोर आली आहे. दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर मध्यरात्री महाविद्यालयाजवळील एका निर्जन परिसरात बलात्कार करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, विद्यार्थिनी शुक्रवारी रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास तिच्या मैत्रिणीसोबत कॅम्पसबाहेर गेली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, "जेव्हा तीन अज्ञात लोक आले तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला एकटे सोडून पळून गेली. आरोपींनी तिचा फोन हिसकावून घेतला आणि तिला कॅम्पसबाहेरील एका निर्जन ठिकाणी नेले, त्यांनी तिच्यावर हल्ला केला. जर तिने या घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली.
" माझी मुलगी अंथरुणाला खिळलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की त्यांनी माझ्या मुलीला येथून ओडिशात, सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, कारण तिची सुरक्षितता येथे धोक्यात आहे, असे पीडित तरुणीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.