

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज होत आहे. महामुंबईतील नऊ जागांसह १३ मतदारसंघांत मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील किसननगर येथील २५५ मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा व कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलतना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, श्रीकांत शिंदे यांनी केलेले काम लोकांसमोर आहे आणि मला वाटते की ते त्यांना तिसऱ्यांदा संधी देतील. नरेंद्र मोदींना पुन्हा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी लोक घराबाहेर पडताना मला दिसत आहेत, असे सांगत शिंदे यांनी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन केले.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वा.पासून सूरु आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदार संघात विद्यमान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम, ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत असे दिग्गज नशीब आजमावत आहेत. मुंबईतील सर्वच सहाही जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मतदार मतदान केंद्रावर येईल, यासाठी कार्यकर्ते आणि समर्थक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील देशातील ४९ जागांवर आज मतदान सुरू आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार देशात १०.२८ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्र ६.३३ टक्के मतदान झाले आहे. बिहारमध्ये ८.८६ टक्के, जम्मू आणि काश्मीरमध्ये ७.६३ टक्के, झारखंड ११.६८ टक्के, लडाख १०.५१ टक्के, ओडिशा ६.८७ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १५.३५ टक्के मतदान झाले आहे.
हेही वाचा :