

Landslide in Ramban
पुढारी ऑनलाईन डेस्क : रामबन जिल्ह्यातील सेरी चंबा भागात आज (दि.२) दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच-४४) दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे महामार्गावर राडारोडा साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकली आहेत. टीसीयू रामबनच्या म्हणण्यानुसार, आज दुपारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सेरी चंबा येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने महामार्गावर चिखल झाला आहे. जेसीबीच्या साहाय्याने मलमा हटविण्याचे काम वेगात सुरू आहे. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
महामार्ग बंद झाल्यानंतर काही वेळात एनएचएआयसाठी काम करणाऱ्या सीपीपीएल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अर्धा डझन जेसीबी मशीन घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ढिगारा काढण्यास सुरुवात केली आहे. रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवाशांना प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.मुसळधार पावसामुळे चिनाब नदीत अचानक पूर आला. त्यामुळे रियासी आणि अखनूर सेक्टरमधील अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
२५० किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावरील नशरी आणि बनिहाल दरम्यान सुमारे १२ ठिकाणी भूस्खलन झाल्याने मार्ग बंद झाल्याने शेकडो वाहने अडकली आहेत.