

बेंगळूरु : बेंगळूरुजवळच्या बन्नेरघट्टा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका ४१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा त्याच्याच क्लॉग स्लिपरमध्ये लपलेल्या विषारी सापाच्या दंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, तो क्लॉग स्लिपर घातल्यानंतर जवळपास 30 मिनिटे चालत होता, पण त्याला सर्पदंश झाल्याचे जाणवलेच नाही. पण त्याचवेळी स्लिपरमधील कोंदट वातावरणामुळे सापाचाही गुदमरून मृत्यू झाला.
मंजू प्रकाश, असे या दुर्दैवी सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव असून तो बन्नेरघट्टामधील रंगनाथा लेआउटचा रहिवासी होता. त्याचा लहान भाऊ हरीश याने या घटनेची माहिती दिली. शुक्रवार (दि. 29), दुपारी 12.45 वाजता मंजू प्रकाश उसाचा रस घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्याने पायात क्लॉग स्लीपर घातली होती. थोड्या वेळाने तो घरी परत आला आणि झोपी गेला.
जवळपास एका तासानंतर, एका कामगाराला मंजू प्रकाशच्या क्लॉग स्लिपरमध्ये सापाचे पिल्लू दिसले आणि त्याने तात्काळ कुटुंबीयांना याची माहिती दिली. हरीशने सांगितले, ‘माझ्या वडिलांनी पाहिले असता त्यांना साप मृतावस्थेत आढळला. तेव्हा आमच्या लक्षात आले की, माझ्या भावाने हीच चप्पल घातली होती. आम्ही त्याच्या खोलीत तपासले, तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्याच्या नाकातूनही रक्त वाहत होते. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.’
मंजूला सापाचा दंश का जाणवला नाही, असे विचारले असता त्याचा भाऊ हरीशने सांगितले की 2016 मध्ये बस अपघातानंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे त्याच्या पायात संवेदनांची कमतरता होती. त्यामुळे त्याने जेव्हा स्लिपर घातली असणार त्यावेळी त्याला सर्पदंश झाल्याची जाणीव झाली नसेल.
या घटनेप्रकरणी बन्नेरघट्टा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.