CJP Protest Delhi : आंदोलनादरम्यान बर्गर खाणं CJP प्रवक्त्याला पडलं महागात; विजेता दहिया यांची पदावरून हकालपट्टी

Burger Controversy : Video सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई
cjp removes vijeta dahiya spokesperson eating burger and skips protest
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) पक्षांतर्गत मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या धोरणांशी तडजोड करत असंवेदनशील वर्तन केल्याचा ठपका ठेवत सीजेपीने मंगळवारी (दि. २१) त्यांचे मुख्य प्रवक्ते विजेते दहिया यांची पदावरून हकालपट्टी केली.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून निदर्शकांवर लाठाचार्ज केला जात असताना दहिया हे एका फास्ट-फूड केंद्रात बर्गर खातानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाने हा तडकाफडकी निर्णय घेतला आहे.

सोमवारी (दि. २१) जंतर-मंतर येथे पक्षाच्या वतीने ‘संसद मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलन प्रसंगी पोलीस आणि निदर्शकांमध्ये जोरदार चकमक झाली. एकीकडे निदर्शक पोलिसांच्या कारवाईचा सामना करत होते, तर दुसरीकडे पक्षाचे मुख्य प्रवक्ते विजेता दहिया हे या तणावपूर्ण वातावरणात आरामात बर्गर खाताना कॅमेऱ्यात कैद झाले.

पक्षाची आक्रमक भूमिका: “असंवेदनशील वर्तन सहन करणार नाही!”

हा व्हीडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि नेटकऱ्यांसह पक्षाच्या स्वतःच्या समर्थकांनीही दहिया यांच्यावर टीकेची झोड उठवली. गंभीर आंदोलनाच्या वेळी दाखवलेल्या या बेजबाबदारपणामुळे सीजेपीची चौफेर कोंडी झाली होती.

पक्षाने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून जारी केलेल्या निवेदनात दहिया यांच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणारे आमचे कार्यकर्ते आणि आमची संपूर्ण टीम पोलिसांच्या लाठीचार्जचा सामना करत असताना, पक्षाच्या प्रवक्त्यांचे असे असंवेदनशील व्हीडिओ समोर येणे अत्यंत खेदजनक आहे. हे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य असून त्यातून योग्य-अयोग्यतेच्या जाणीवेचा अभाव दिसून येतो. ही कृती आमच्या आंदोलनाची मूल्ये आणि तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे,” असे पक्षाने नमूद केले. या शिस्तभंगाच्या कारवाईअंतर्गत दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवून त्यांच्याकडील सर्व अधिकृत जबाबदाऱ्या तातडीने काढून घेण्यात आल्या आहेत.

‘मला भूक लागली होती’

दरम्यान, आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना विजेता दहिया यांनी एक स्पष्टीकरण देणारा व्हीडिओ जारी केला. आपण आंदोलनात सहभागी झालो होतो, परंतु आंदोलन संपल्याचे लक्षात आल्यावरच तिथून निघालो, असा दावा त्यांनी केला. “मी बर्गर का खाल्ला? हा आजचा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. माणूस बर्गर का खातो? कारण त्याला भूक लागलेली असते. मलाही प्रचंड भूक लागली होती आणि काहीतरी छान खाल्ल्यावर मनाला समाधान मिळते, एवढाच तो विषय होता,” असे दहिया यांनी म्हटले.

दहिया यांनी केला स्वतःचा बचाव

याशिवाय, आपले कष्ट दुर्लक्षित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मी आणि आंदोलनात सहभागी झालेले इतर सहकारी गेली दोन दिवस अजिबात झोपलेले नाही, हे कोणालाही दिसत नाही. आंदोलनाच्या ठिकाणाहून निघाल्यानंतर मी घरी जाऊन स्नान केले आणि त्यानंतरच काहीतरी खाण्यासाठी बाहेर पडलो होतो,” असे सांगत दहिया यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षाने त्यांचे हे स्पष्टीकरण अमान्य करत अखेर त्यांची हकालपट्टीच केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news