

नवी दिल्ली : ‘तो आता आमच्यासाठी विसरलेला अध्याय आहे’. असे म्हणत सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याच्या प्रकारावर सरन्यायाधीशांनी मौन सोडले. गुरुवारी ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी काही वर्षांपूर्वी एका सुनावणीदरम्यान घडलेल्या अशाच घटनेचा उल्लेख केला तेव्हा सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली.
सरन्यायाधीश म्हणाले की, सोमवारी घडलेल्या घटनेने मी आणि माझ्यासोबत बसलेल्या न्यायाधीशांना धक्का बसला मात्र आता हा आमच्यासाठी विसरलेला अध्याय आहे. तर खंडपीठावरील दुसरे न्यायाधीश उज्जल भुईंया म्हणाले की ही घटना सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. याबद्दल माझे वेगळे मत आहे. ही घटना विसरता कामा नये. ते देशाचे सरन्यायाधीश आहेत. त्यामुळे संपूर्ण संस्थेसाठी धक्का आहे कारण, न्यायाधीश म्हणून, वर्षानुवर्षे, आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्या इतरांना योग्य वाटणार नाहीत, मात्र त्यामुळे आपल्या स्वतःच्या निर्णयावरील विश्वास कमी होत नाही, असेही ते म्हणाले.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, हा एक अक्षम्य गुन्हा असला तरी, न्यायालय आणि खंडपीठाने दाखवलेला संयम आणि उदारता कौतुकास्पद होतीम तरीही न्यायालयात घडलेला तो प्रकार पूर्णपणे अक्षम्य होता.