नवी दिल्ली : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी वाढवण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. संरक्षण खात्याकडील तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्यासंदर्भात नागरी विमान उड्डान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. विस्तारासंदर्भात अपेक्षित लागणारी जागा संरक्षण खात्याची असून याबाबतही भेटीत चर्चा झाल्याचे मोहोळ म्हणाले.
या बरोबरच पुणे विमानतळावर गेल्या दीड महिन्यांपासून एअर इंडियाचे विमान पार्किंग उडाणपट्टीवर उभे आहे. त्या विमानाला दुरुस्तीसाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणून सदरील विमान दुरुस्ती होवू पर्यंत संरक्षण खात्याच्या जागेत लावण्यासाठी परवानगी द्यावी, या संदर्भातही यावेळी राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्याचे मोहोळ म्हणाले.
खडकी कॅन्टोन्मेंटच्या जागेतील स्थानिकांच्या घरांचा भाडेकरार संपलेला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुन्हा दीर्घमुदतीचा भाडेकरार लवकरच करण्यात यावा, अशीही मागणी मोहोळ यांनी केली. या सर्व मागण्यांवर राजनाथ सिंह यांनी सकारात्मकता दर्शविली असून यावर लवकरच निर्णय होईल, असा विश्वास मंत्री मोहोळ यांनी व्यक्त केला.