धावपट्टी विस्तारावर थेट संरक्षणमंत्र्यांना पत्रच; केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भेट

धावपट्टी विस्तारावर थेट संरक्षणमंत्र्यांना पत्रच; केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भेट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले असून, संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी भारतीय हवाई दलाला सूचना द्याव्यात, अशी विनंती केली आहे. पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.

युरोपीय देश, अमेरिका, जपान या देशांशी थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्यामुळे शहराच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, महाकाय विमानांची ये-जा सुलभ करण्यासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज आहे. भारतीय हवाई दलाच्या मालकीच्या पुणे विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. या विस्तारामुळे महाकाय विमानांची ये-जा सुलभ होईल व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकेल, असेही पत्रात म्हटले आहे.

धावपट्टी 1000 मीटरने वाढवण्याची आवश्यकता

सध्याच्या धावपट्टीची लांबी 2535 मीटर आणि रुंदी 45 मीटर आहे. या धावपट्टीवर आता फक्त इ-321 आकाराची प्रवासी विमानेच उतरू शकतात. त्यामुळे पुणे विमातळावरील धावपट्टीची लांबी मोठी विमाने उतरण्यासाठी सुमारे 1000 मीटरने वाढवणे आवश्यक आहे.

पुणे हे शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी हब असल्याने या प्रस्तावामुळे शहराच्या विकासाला आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. नवीन ग्रीन फिल्ड विमानतळ बांधण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे 14 जून 2024 रोजी आम्ही पुणे विमानतळावर आढावा बैठक घेतली. त्या वेळी धावपट्टीच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले आहे. सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट्सच्या आवश्यकतांचे पालन करणार्‍या क्षेत्राचे 'ओएलएस' संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी योग्य सूचना देण्याची विनंती, या पत्रात करण्यात आली आहे. सोमवारी जाऊन त्यांना भेटणारही आहे.

– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक व सहकार.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news